जेवढी विकासकामे मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात झालीत तेवढी ६५ वर्षांत झाली नाहीत. यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. 'भारत के मन कि बात' या अभियानांतर्गत मंत्री मुंडे यांच्यावर औरंगाबाद शहरातील पर्यटनाशी संबंधित उद्योजकांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या पार्शवभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मोदी सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती देताना पंकजा मुंडे म्हणाल्या कि, रस्ते, वीज, पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढलेला मान, पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर, गरिबांसाठी सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत योजना, उज्वला योजना यामुळे देशातील सामान्य जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
जनतेच्या सूचनांचाही होणार विचार...
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील सर्वच राज्यात 'भारत के मन कि बात' हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील विविध वर्गाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहॆ. यासाठी केंद्रातील तसेच राज्यातील भाजप नेत्यांना सरकारने कामाला लावलेले असून औरंगाबाद येथील पर्यटनाशी संबंधित उद्योजकांशी संवाद साधण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील जनतेशी 'मन कि बात' करत असतात. याद्वारे ते देशातील विविध मुद्द्यावर भाष्य करतात. मात्र, देशातील जनतेच्या सूचनांचाही विचार व्हावा यादृष्टीने 'भारत के मन कि बात' या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये देशातील जनतेचा सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाणार आहे. 'आकांक्षा बॉक्स' मध्ये जनता आपल्या सूचना टाकून त्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचवू शकतात. जनतेच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्याचा समावेश निवडणूक जाहीरनाम्यात केला जाऊ शकतो असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.